डोंबिवली : पश्चिमेतील गरीबाचावाडा अनमोलनगरी परिसरातील जलवाहिन्यातून दररोज हजारेा लीटर वाया जाणारे पाणी आता थांबणार आहे. मागील आठवडयात सिटीझन जर्नलिस्ट न्यूज मिडीयाने ने या समस्येवर प्रकाश टाकला होता. मात्र नवे पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने पाणी गळती थांबविण्याचे आदेश संबधित विभागाला दिले. त्यानंतर पाणी पुरवठा अधिका- यांची झोप उडाली. प्रशासनाने तातडीने याठिकाणी १५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्तांच्या धडाकेबाज निर्णयाचे नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून गरीबाचावाडा परिसरातील महालक्ष्मी चौक ते अनमोल नगरी या रस्त्यावरील जलवाहिनीतून पाणी गळती आणि साचलेल्या पाण्याच्या समस्येबाबत पालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती वामन म्हात्रे हे प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र याकडे प्रशासनातील अधिका-यांनी नेहमीच कानाडोळा केला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी सुरूच होती. तसेच स्थानिक रहिवाशांनाही त्या साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. मात्र नवे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी सभापती वामन म्हात्रे यांनी पून्हा या समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. मात्र नव्या आयुक्तांनी या समस्येची गांभिर्याने दखल घेतल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी थांबवणार आहे. तसेच रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढणा-या नागरिकांची या समस्येतून सुटका होणार आहे. वामन म्हात्रे यांनीही आयुक्तांचे आभार मानले आहे.
१५० मी. मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकणार
सदर ठिकाणी सरोवरनगर येथील चाळींचे कनेक्शन आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे वारंवार पाईपलाईन फुटत आहेत. तसेच एक इंच व्यासाच्या पाईपांमुळे खोदाई करता येत नाही व लिकेज बंद करता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी १५० मीमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. महालक्ष्मी चौक ते निर्माणधीन टॉवर इमारतीच्या मागील भागापर्यंत ही नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. नवीन जलवाहिनीवर सर्व नळ जोडण्या शिफ्टिंग केल्या जाणार आहेत. शिफ्टिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर लिकेज पूर्णपणे बंद होणार आहे. तोपर्यंत तात्पुरती उपाययोजना म्हणून ऑक्सफर्ड शाळेसमोरील मोठा व खोल खड्डा खडीकरणने लेव्हल करण्यात येत आहे असे पालिकेचे उपअभियंता अ. श. सराफ यांनी कळविले आहे.
हिच का स्वच्छ आणि सुदंर डोंबिवली ….