मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.या भेटीत राष्ट्रवादीतील फुटीनंतरची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या बैठकीत महाविकास आघाडी अभेद्य ठेवण्यासाठी चर्चा झाली. भाजप विरोधात एकजुटीने व सक्षमपणे लढा देण्यासाठी लवकरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रीत महाराष्ट्र दौरा करण्याचे निश्चित करण्यात आलं.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान भवनातील कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या सर्व विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, आशिष दुआ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रभारी एच के
पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून गेले आहेत परंतु या दोन्हीही नेत्यांच्या मागे आजही मोठे जनसमर्थन आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत व भाजपाविरोधात एकजुटीने व सक्षमपणे यशस्वी लढा देऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
देशात मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी होत आहे. विरोधकांची वाढती ताकद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला असून नैराश्येतून पक्ष फोडण्याचे काम भाजपा करत आहे. या पक्षफोडीसाठी ईडी, सीबीआय अशा तंत्रांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरु असताना काँग्रेस पक्ष एकजूट व मजबूतपणे उभा असून पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी या एकजूटीतून दाखवून दिले आहे. या बैठकीला ३९ आमदार उपस्थित होते, जे आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी आम्हाला त्याची सुचना आधीच दिली होती. असेही एच के पाटील यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे. काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही. शाहु, फुले, आंबडेकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण होत आहे हे जनतेला पटलेले नाही. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे आज आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ज्या पक्षांची सदस्य संख्या जास्त त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या दोन स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली जाईल असे पटोले यांनी सांगितले.
या बैठकांनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. या दौऱ्याला उत्तर महाराष्ट्रातून लवकरच सुरुवात होणार असून लोकशाहीविरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या पदाधिका-यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम आ. बळवंत वानखेडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, नसीम खान आदी उपस्थित होते.
दरम्यान, दुसरीकडं शिवसेनेच्या ठाकरे गटाचीही बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचं मान्य करण्यात आलं. शरद पवार एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते मजबूत आहेत मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंसारखेच आहेत ते कधीही स्वतःला एकटं समजणार नाहीत, असं शिवसेनेच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी म्हटलं आहे.