मुंबईत : इंडिया आघाडीची तिसरी बैठक आजपासून मुंबई ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे. आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होईल. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी विविध राज्यातील एकूण २८ पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मुंबईत आगमन झाल्यानंतर या नेत्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले जात आहे तर या नेत्यांसाठी खास मराठमोठया पदार्थांचा अस्वाद चाखायला मिळणार आहे. वडापाव आणि झुणका भाकरपासून ते पुरणपोळी पर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थांवर पाहुण्यांना ताव मारता येणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी बुधवारपासूनच नेते मुंबईत दाखल झाले आहेत. जम्मु काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री नितीशकुमार सपाचे अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत. गुरूवारी दुपारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी हे मुंबईत दाखल झाले त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. आज संध्याकाळी ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. देशभरातील महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचं आयोजन केलं आहे. पाहुण्यांसाठी स्वीट डिशमध्ये नारळाची करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पाहुण्यांना गरमागरम पुरणपोळीचा अस्वादही चाखता येणार आहेत. या पाहुण्यांसाठी झुणका भाकरही ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्यासहीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेलही यावेळी असणार आहे.
ग्रँड हयात हॉटेलमध्ये 100 हून अधिक रुम बुक करण्यात आले आहेत. हॉटेलच्या आसपासच्या हॉटेलमधील रुमही बुक करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असली तरी उद्धव ठाकरे हेच या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व करत आहेत. तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. आज संध्याकाळी सर्व नेत्यांची औपचारिक बैठक होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने ही बैठक व्यवस्थित पार पडावी म्हणून 18 लोकांची एक टीम तयार केली आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांच्या 6-6 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. उद्या 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या जेवणावळीवर मनसेने टीका केली आहे. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. तर भाजपकडूनही या बैठकीवर टीका केली जात आहे.