मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, मुंबई मराठी पत्रकार संघा तर्फे ‘रागदारी स्वरलतेची’ या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन येत्या सोमवारी, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. पत्रकार भवनात करण्यात आले आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक पं. अमरेंद्र धनेश्वर व मुक्ता रास्ते हे या कार्यक्रमात, लतादिदींच्या अजरामर चित्रपट गीतांमधील रागदारीच्या प्रात्यक्षिकांसह ही गीते सादर करतील. संदीप मिश्रा (सारंगी), मुक्ता रास्ते (तबला), जयंत नायडू (तानपुरा) हे कलाकार त्यांना साथसंगत करणार असून, पद्मजा दिघे या सूत्रसंचालन करतील. अवीट गोडीच्या या गीतांची पार्श्वभूमी, इतिहास आदींबाबतही रंजक माहिती यावेळी देण्यात येईल. तसेच काही गीते ध्वनीफितीच्या माध्यमातून दिदींच्या आवाजात ऐकविली जातील.
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांच्या संयोजनातून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना पत्रकार संघाने वाहिलेली भावांजली होय ! आझाद मैदान (सीएसटी रेल्वे स्थानकानजिक) येथील पत्रकार भवनात होणारा हा रंगतदार कार्यक्रम सर्व जनतेसाठी विनामूल्य खुला आहे. सर्व पत्रकारांप्रमाणेच अन्य रसिकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी केले आहे.