मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरात दु:खाची लाट उसळली. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे.
पाचव्या वर्षापासून गायनाची सुरुवात !
लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे झाला होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक कुशल थिएटर गायक होते. दीनानाथजींनी लतादीदी पाच वर्षांच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. त्याच्यासोबत आशा, उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायच्या. लतादीदींनी ‘अमान अली खान साहिब’ आणि नंतर ‘अमानत खान’ यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतात होती. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली.
सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम
भारतातील ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत.लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत. 1949 मध्ये ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्यातून लतादीदींना अशी संधी मिळाली. हे गाणे त्या काळातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुबालावर चित्रित करण्यात आले होते. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि लता आणि मधुबाला या दोघींसाठीही हा चित्रपट खूप लकी ठरला. यानंतर लतादीदींनी कधीही मागे वळून पाहिले नाही.