कल्याण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या विकासाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल : पंकजा मुंडे
मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कल्याणात २२ एकर जागा खरेदी केली होती. त्या जमिनीचा प्रश्न आमदार जगन्नाथ ( आप्पा) शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केेला. त्या जागेवर विविध उपक्रम राबविण्याची मागणी शिंदे यांनी केली. त्यावर उत्तर देताना महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणारे असल्याचे सांगितले. सरकारच्या या सकारात्मक उत्तरामुळे मौजे जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकेकाळी खरेदी केलेल्या जागेत लोकोपयोगी प्रकल्पांना लवकरच चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौजे जांभूळ ता. कल्याण येथे 1936 साली 22 एकर शेतजमीन खरेदी (फेरफार नं. 121) केली होती. सदर जमीन 1943 साली रावळगांव शुगर फॅक्टरीला विकली असल्याची (फेरफार नं. 180) नोंद आढळत असून, रावळगांव शुगर फॅक्टरीने या परिसरात शेकडो एकर जागा खरेदी केली होती. परंतु, या ठिकाणी साखर कारखाना मात्र काढण्यात आला नाही. सदर जागा मोकळी व पडीक राहिल्याने काही स्थानिक मंडळींनी या जमिनीवर भातशेतीची लागवड करण्यास सुरुवात केल्याने कालांतराने कुळवहिवाट कायद्यानूसार या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे झाल्याचेही काही 7/12 च्या नोंदीत आढळते.
या जागेत महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास खात्यांतर्गत यापुर्वी सर्टिफाईड स्कूल व बेगर होम चालविले जात होते. मात्र सर्टिफाईड स्कुलमध्ये लहान मुले असल्याने व शहरी भागापासून ही जागा दुर असल्याने सर्टिफाईड स्कुल उल्हासनगर येथे स्थलांतरीत करत त्याजागी पुरुष भिक्षेकरी गृह 1972 पासून चालविण्यात येत आहे.
शासनाच्या या उपक्रमाशिवाय लगत असलेल्या सुमारे 7 एकर जागेत शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त समता वर्ष साजरे करताना बाबासाहेबांचे वास्तव्य ज्या ज्या ठिकाणी झाले असेल अथवा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमिचा उचीत विकास करुन त्याठिकाणी स्मारक उभारण्याचे घोषीत केले होते. त्याला अनुसरुनच आमदार शिंदे यांनी जांभूळ येथील एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरेदी केलेल्या जागेत नियोजीत स्मारक उभारताना त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय, सांस्कृतीक भवन, ग्रामीण रुग्णालय ,वसतीगृह, आश्रमशाळा, वृध्दाश्रम, महिला उद्योग विनिमय केंद्र, विपश्यना केंद्र, टेक्नीकल/ इंजिनियरींग/ मेडिकल कॉलेज आदि उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे सुरु करण्याबाबत डॉ. बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठानच्या मागणीनूसार कारवाई करण्याची मागणी केली. महिला व बालविकास खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडेे यांनी सदरचा प्रस्ताव आपल्यापर्यंत अद्याप आला नाही. त्यावर आमदार आप्पा शिंदे यांनी याबाबत सदर संस्था 2016 पासून शासनाकडे पाठपूरावा करत असून, महसूल विभागाने शासनस्तरावर निर्णय अपेक्षीत ठेवले असताना आपण जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून सदर प्रस्ताव मागवुन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली, त्यावेळी मुंडे यांनी प्रस्ताव मागवुन घेण्यात येईल व आमदार शिंदे आणि डॉ. बी.आर. आंबेडकर प्रतिष्ठान यांचेशी बैठक घेवून चर्चा करुन पुढील उचीत कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या चर्चेत आमदार हेमंत टकले, आमदार विद्याताई चव्हाण यांनी सहभाग घेतला.