कल्याण : पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर फारकत सुरू असतानाच एका तरूणीला प्रेमाच्या जाळयात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवित तब्बल आठ वर्षे शरीरसंबध ठेवून तिस-या तरूणीसोबत लग्नाच्या बंधनात अडकलेल्या साईनाथ उर्फ प्रकाश देसले नामक लखोबा लोखंडेला बाजारपेठ पोलिसांनी बेडया ठेाकल्या.
कल्याण येथे राहणारा साईनाथ देसले हा एलआयसी एजंट आहे. उल्हासनगर येथे राहणारी ३० वर्षीय तरुणी देसले याच्या संपर्कात आली. सुरुवातीला त्याने अविवाहित असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने मे २०२० मध्ये तिस-या तरुणीसोबत विवाह केल्याचे त्या पीडीत तरुणीला कळताच तिने मर्जी संघटनेच्या साथी जोडो अभियानांतर्गत संघटनेकडे तिने कैफियत मांडली. संघटनेमार्फत मिळालेल्या मार्गदर्शनानंतर तरुणीने स्वत: पुढाकार घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्याआधारे अखेर बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी साईनाथ उर्फ प्रकाश देसले याच्याविरुध्द भा.दं.वि.सं. चे कलम ५०६, ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या पीडीतांनी मर्जी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या सल्लागार ऍड . तृप्ती पाटील यांनी केले आहे.