जळगाव : लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. कुणाचा बापही लाडकी योजना बंद करू शकणार नाही असंही ते म्हणाले. जळगावमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याची टीकाही केली. त्यातच महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत, या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं लाच देताय का, कुणी म्हणालं मतं खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणालं की १५०० रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत.
कुणाचा बापही ही योजना बंद करू शकत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. येत्या काळात महिला सक्षम झाल्यानंतर महाराष्ट्र कधीच मागे पडणार नाही. मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या महिला बचत गटाचा एक एक पैसा पैसा परत करतात. २५ तारखेला याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत.
३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही देऊ असं देवेंद्र फडणवसींनी सांगितलं. ते म्हणाले की, महिलांच्या हाती पैसे पडले की ते योग्य ठिकाणी कारणी लागतात. मात्र पुरुषांच्या हातात पैसे पडले तर ते कुठे जातील हे सांगता येतं नाही.