मृतांबाबत मुख्यमंत्र्यांची सहवेदना, जखमींच्या उपचारांबाबतही दिले निर्देश

मुंबई, दि. 28 : – मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दूर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत.

मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही 4 मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच पर्यटन, पर्यावरण आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री २.०० वाजता घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली.

कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ रात्री २.०० वाजता कुर्ल्यातील इमारत दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी, संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधत त्यांनी मदत व बचावकार्य वेगात सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच, दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत जे लोकं जखमी झाले आहेत ते लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

पालिकेकडून नोटीस आल्यास इमारती खाली करा, आदित्य ठाकरेंची विनंती

ज्या इमारतींना पालिकेने नोटीस पाठवली असेल त्या इमारतीमधील नागरिकांनी इमारती खाली कराव्यात अशी कळकळीची विनंती आदित्य ठाकरे यांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना केली.

मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्तपासणी करण्यात येईल. मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा इमारती खाली कराव्यात. त्यामुळे, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणं मदतीचं ठरेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *