बदलापूर : महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी महायुती सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवीत आहे. विरोधकांकडून योजनेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असला तरी एकनाथ शिंदे हा शब्द पाळणारा भाऊ आहे. त्यामुळे आता महिलांनीही ‘आपलं लाडकं सरकार’ लक्षात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र विरोधकांनी अपप्रचार केला की जमा झालेले पैसे काढून घेतले जातील. पण आमची ‘देना बँक’ आहे ‘लेना बँक’ नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. आधीचे सरकार हप्तेवसुली करणारे होते. आमचे सरकार हे गरजूंच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना ही कधीही बंद पडणार नाही. विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. महिलांना पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या हेच खोडा घालणारे विरोधक तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना जोडा दाखवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.