मुंबई : मुंबईत एका क्रुझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई केल्यानंतर त्यात काहींना ताब्यात घेतलं त्यात एक नाव होतं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनचा आणि ती कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे…त्यामुळे या दोन नावाची चर्चा चांगलीच गाजली. मात्र या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वेगवेगळे खुलासे आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागत गेलं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर खंडणीचे तसेच वैयक्तिक स्वरूपाचेही आरोप केले. त्यानंतर समीर वानखेडे हे अभिनेत्या क्रांती रेडकर यांचे पती आहेत त्यामुळे आता पतीसाठी त्या मैदानात उतरल्या. क्रांती यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत समीर वानखेडेंवर खंडणीचे तसेच वैयक्तिक स्वरूपाचेही आरोप केले. काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्वीट केला. समीर यांची पहिली पत्नी मुस्लिम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मलिकांच्या रेाजच्या नवनव्या आरोपा व खुलाशानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
क्रांती रेडकर यांची कारकिर्द ….
२०१७ साली क्रांती यांचा समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला होता. क्रांती आणि समीर यांना झिया आणि झायदा या दोन जु्ळ्या मुली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्या क्रांती रेडकर यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं. रामनारायण रुईया कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. २००० साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पर्दापण केलं. ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात त्यांच पदार्पण झालं. त्यानंतर २००३ साली ‘गंगाजल’ चित्रपटात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली. २००६ साली आलेल्या ‘जत्रा- ह्याला गाड रे त्याला गाड’ या चित्रपटात क्रांती यांची भूमिका होती. याच चित्रपटातल्या कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्यानं क्रांती यांना लोकप्रियता मिळवून दिली. माझा नवरा, तुझी बायको, शिक्षणाच्या आयचा घो, फुल थ्री धमाल, लाडीगोडी, ऑन ड्युटी २४ तास, नो एन्ट्री- पुढे धोका आहे, खो-खो अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१४ साली क्रांती यांनी ‘काकण’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.