कोरिअन शिष्टमंडळाची कल्याणला स्मार्ट भेट :
वर्षभरात टाऊनशिपचे काम सुरू होणार : महापौर राजेंद्र देवळेकर
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आणि लँड अँड हाऊसिंग या कोरिअन कंपनीमध्ये एक महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. कोरिअन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज कल्याणमधील टाऊनशिप परिसराची पाहणी केली. या शिष्टमंडळात एलएच कोरिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष पार्क सॅंग वू , कंपनीचे डायरेक्टर जनरल ली जीऑेग वुक, ली की योल, कॅंग कु हॅवॅग व अन्य पदाधिका-यांनी आज महापालिका मुख्यालयात महापौर राजेंद्र देवळेकर, महापालिका आयुक्त पी. वेलारासु यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांत टाउनशिप विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून, प्रत्यक्ष कामांना सुरूवात होईल, असे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करावयाच्या कल्याण येथील सापाड, वाडेघर येथील २५० हेक्टर जमिनीवर नवीन टाउनशिप विकसित करण्याची महापालिकेची योजना आहे. हे टाउनशिप अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी साउथ कोरिया येथील लॅन्ड अॅन्ड हाउसिंग कारर्पोरेशन या शासकीय कंपनीने सहभाग घेण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, एक वर्षापासून या प्रकल्पावर कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत अभ्यास चालू आहे. कल्याण शहराच्या सुनियोजित विकासासाठी आज दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळने महानगरपालिकेस भेट दिली. या भेटीदरम्यान कल्याण नदी किनारालगतच्या जमिनीवर टाउनशिप विकसित करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींनी नियोजित जागेची पाहणी केली. कल्याण आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी कोरिअन सरकारने एक नियोजन आराखडा बनवला आहे. त्यानूसार कल्याणच्या नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार हे नियोजन केले जाणार असून दळण वळणाच्या सुविधा, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, सुरक्षा आदी प्रमुख गोष्टींचा त्यात समावेश असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरिअन सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधीपक्षनेते मंदार हळबे, भाजप गटनेते वरुण पाटील, माजी सभागृहनेते सचिन बासरे, अरविंद मोरे, रवींद्र कपोते महापालिकेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती वैशाली पाटील, एमआयएम गटनेत्या तनझिला मौलवी व महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.
कल्याण शहराच्यादृष्टीने महत्वाचा टप्पा : आयुक्त पी वेलारासू
आयुक्त पी. वेलारासु यावेळी म्हणाले की, एलएच कोरिया कंपनीशी महानगरपालिकेने यापूर्वी केलेल्या करारानुसार दोन्ही पक्षांकडून योजनेचा सखोल अभ्यास सुरू असून , महापालिकेतर्फे आवश्यक ती मदत कोरियन कंपनीस करण्यात येत आहे. कल्याण शहराच्यादृष्टिने हा महत्वाचा टप्पा असून, याद्वारे काही वर्षातच कल्याण शहराचा कायापालट होणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत राबवावयाच्या योजना जलदगतीने पूर्ण करण्याचा आमचा मानस असून, प्रस्तावित टाउनशिपसाठी कोरियन कंपनीबरोबर यापुढेही शासनाच्या मान्यतेने निश्चित होणा-या योजनांची कामेही शीघ्रतेने करण्यास आमचे प्राधान्य राहील.
विकासासाठी उत्तम ठिकाण : पार्क सॅंग वू
एलएच कोरिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्क सॅंग वू यांनी याप्रसंगी सांगितले की, कल्याण हे शहर मुंबईलगत असून भौगोलिकद्ष्टया या शहराला मोठा नदी किनारा लाभला आहे. नव्याने विकास होण्याकरिता योग्य व पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्यातुन कल्याण शहर विकसित होण्याकरिता उत्तम ठिकाण असल्याने आम्ही या शहराची निवड केली आहे. भारत आणि कोरिया या देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारात एकमेकांचे सहाय घेवून विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे.भारत आणि कोरिया या दोन्ही देशात चांगले संबंध आहेत, त्यामुळे कल्याणव्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये देखील आम्ही स्मार्ट सिटीअंतंर्गत कामे घेणार आहेात.
बाळासाहेबांना आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी कोरियन टीमने बाळासाहेब ठाकरे स्मारकाला दिली भेट. यावेळी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. महापालिका वतीने आज स्मारकात भजन, व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर व माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी कोरिअन शिष्टमंडळाला भगवा तलावाची माहीती दिली तसेच आर्ट गॅलरी, कार्टून दालनही त्यांना दाखविण्यात आले. स्मारक पाहून कोरिअम शिष्टमंडळाने प्रशंसा केली.