छकुलीला न्याय मिळाला, कोपर्डीतील तिघेही नराधम फासावर
अहमदनगर : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठेाठावण्यात आलीय. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. माझ्या छकुलीला न्याय मिळाला, पण आरोपींना फाशी मिळाली तरी माझी छकुली परत येणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली.
न्यायाधीश कोर्टरूममध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच मिनीटात निकालाचे वाचन करून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डी निकालाची सुनावणी असल्याने न्यायालय कक्षात तुफान गर्दी झाली होती. पीडितेची आई, बहीण आणि कोपर्डीचे नागरिक पहिल्या रांगेत बसले होते. कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायालयात आले. त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. निकाल ऐकण्यासाठी लाऊडस्पीकरची ही व्यवस्था करण्यात आली. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल एक हजार पोलिस तैनात करण्यात आले. तसंच कर्जत आणि कोपर्डी गावात ही बंदोबस्त वाढवण्यात आला. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. आरोपींना सगळ्या शिक्षा एकत्रित भोगायच्या असून, आरोपींना हायकोर्टात जाण्याचा अधिकार आहे.
काय होत प्रकरण
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाच्यावेळी कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष वेधलं होतं.