नवी मुंबई, दि.26 -: “जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.

विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात सकाळी 11.00 वाजता उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (पुरवठा) .विवे‍क गायकवाड, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (नगरपालिका) .रविंद्र जाधव हे उपस्थित होते.

दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येते, त्या सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या 2021 या वर्षी हा सप्ताह केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक 26 ऑक्टोबर 2021 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या दक्षता जनजागृती सप्ताहाचे बोधवाक्य “स्वतंत्र भारत @75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे” असे आहे.

मनोज रानडे यांनी यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *