लोकसेवा समितीच्या कोकण महोत्सवाला डोंबिवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली : येथील लोकसेवा समितिच्या विसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अरुणोदय सोसायटी मैदान महात्मा फुले रोड डोंबिवली पश्चिम येथे भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाचे उदघाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी समाजसेवक सुभाष परुळेकर, नगरसेवक विश्वनाथ राणे, संदीप पुराणिक, विरोधी पक्षनेता मंदार हळबे, माजी नगरसेवक नंदू धुळे, परब मराठा महासंघाचे अध्यक्ष तथा उद्योगपती श्रीकृष्ण परब, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणातील नामांकित भजनी बुवा अभिषेक शिरसाट, संतोष जोईल आणि संमीर कदम यांच्यात तिरंगी सामना झाला. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पारंपरिक पालखी, देवदेवतांच्या स्वाऱ्या, सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिहर नातू यांचे कीर्तन, देवगडच्या सिद्धेश्वर पावणारी मंडळाची सुप्रसिद्ध दिंडी, शक्तीतुरा सामना, दशावतार, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसेवा पुरस्कार आदी कार्यक्रम आहेत. हा महोत्सव विनामूल्य असून, ३१ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. कोकणवासीयांनी या महोत्सवाला भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन अध्यक्ष रामचंद्र परब आणि सचिव विवेकानंद बागवे यांनी केले आहे.