१९ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे. तसेच कृषी संस्कृतीत या दिवसाला महत्व आहे. … याला ‘शरद पौर्णिमा’, ‘माणिकेथारी’, ‘नवान्न पौर्णिमा’ , कौमुदी पौर्णिमा, ‘माडी पौर्णिमा’ असे देखील म्हणतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून ‘कोजागर्ती’? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. मसाला दूध पिण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात, अशी मान्यता असल्याचे सांगिले जाते. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर पिस्ता बदाम चारोळी वेलदोडे जायफळ साखर वगैरे गोष्टी टाकून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो दुधात मध्यरात्र पूर्णचंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यँत जागरण केले जाते.
कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. अशी भावना असते की रात्री लक्ष्मी मातेचा वास असतो आणि ती भक्तांना धन-धान्य लाभो असा आशिर्वाद होतो. या दिवशी रात्रभर जागून लक्ष्मी मातेचं भजन केलं जातं. या रात्री जागणाऱ्या भक्तांना लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो. म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं. कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. जी माणसे जागरण करत नाहीत, त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते. कोजागरीला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते.
संकलक : रमण देशमुख, डोंबिवली