दौलताबाद, 30 ऑक्टोबर : तेलंगणाच्या मेडकचे खासदार कोथा प्रभावर रेड्डी यांच्यावर प्रचार रॅलीमध्ये जिवघेणा हल्ला झाला. रेड्डी यांच्यावर आज, सोमवारी प्रचारादरम्यान एका व्यक्तीने चाकू हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार कोथा प्रभावर रेड्डी हे भारत राज्य समितीचे (बीआरएस) दुब्बकाहून खासदार आहेत. त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आलीय. दौलताबाद मंडळातील सुरमपल्ली गावात खासदार प्रभाकर रेड्डी हे प्रचार करत होते. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर तिथे गोंधळ उडाला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या त्या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी पकडले आणि चोप दिला आहे. तिथे पोलिसही असल्याने आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रभाकर रेड्डी यांना तातडीने गजवेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांना तिथून हैदराबादला हलविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. अद्याप हल्लेखोराची माहिती मिळालेली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. तेलंगानाचे अर्थ मंत्री टी. हरीष राव यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते गजवेलकडे निघाले आहेत.