कल्याण : मैत्रकुल या विद्यार्थी घरकुलाची शिक्षणाचा जागर करणारी शिक्षणवारी सुरू झालीय. वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आजीवन काम करणाऱ्या किशोरदा गणाई मैत्रकुल ते कुलाबा संकल्प हिलचेअर यात्रा शनिवार ६ ऑगस्टपासून कल्याण येथून सुरु झाली. कॅप्टन अमोल यादव , ऍड उदय रसाळ, ऍड पूजा बडेकर, विजेता भोनकर , निलेश भोईर, संतोष जाधव , आशिष गायकवाड ,स्मिता साळुंखे राकेश सुतार तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षणवारी ला आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली.
किशोरदा हे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व उज्वल भवितव्यासाठी गेली 40 वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच गेली 5 वर्षांपासून मैत्रकूल जीवन विकास केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत पोटतिडकीने काम करतात. मैत्रकूल हे पूर्णपणे लोकनिधीतून उभे राहत आहे. आज मैत्रकूल चे 4 शाखा आहेत परंतू आजही मैत्रकूल ची स्वहक्काची जागा नसल्याने विद्यार्थ्यांना हव्या त्या सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागतेय..
मैत्रकूल ला शासकीय अनुदान मिळत नाही.. स्वहक्काची जागा उभी करण्यासाठी आज किशोर दादा कल्याण बापगाव पासून डोंबिवली ,ठाणे, नवी मुंबई, चेंबूर, मुलुंड, बोरिवली, दादर, फोर्ट कुलाबा पर्यंत व्हीलचेअर ने प्रवास करत रस्त्यातील सोसायटी, बँक, विविध ऑफिसेस मध्ये प्रत्येकी 2000 रुपये द्यावे अश्या
आवाहनासोबत ह्या यात्रेची सुरुवात किशोर दादांनी आज केली आहे. तब्बल 2 महिन्याच्या ह्या प्रवासात आपल्याला जमेल तशी मदत करावी असे आवाहन किशोरदा यांनी केले आहे.
महाराष्ट्र उच्चशिक्षीत करण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या व त्या करता छात्रशक्तीच्या माध्यमातून नापासांच्या शाळा ,फुटपाथशाळा ,सिग्नलशाळा , बागशाळा व वस्तीशाळा वगैरे गेली चाळीस वर्ष चालवणाऱ्या किशोरदा गणाई यांनी हातापायात रॉड आल्यानंतर बहिष्कृत,शिक्षणवंचित व शिक्षणबाह्य झालेल्या होतकरू मुलीमुलांच्या शिक्षणाकरिता मैत्रकुल हे विद्यार्थीगृह खरे तर घरकुलासारखे गुरुकुल सुरू करून मुलांना सर्वार्थाने सक्षम करण्याचे काम केले. हे मैत्रकुल पाच वर्ष कल्याण येथे भाड्याच्या जागेत सुरु आहे ,जेथे सर्व जातीधर्माचे ,भाषेचे विद्यार्थी संचालक म्हणून गुण्यागोविंदाने चालवतात अशी माहिती मैत्रकुल प्रमुख आशिष गायकवाड यांनी दिली
मैत्रकुल भाड्याच्या जागेत असल्याने त्याला अनेक मर्यादा येतात मैत्रकुलला ना कोणी धनवान, ना सरकार मदत करते ,मैत्रकुल लोकनिधीतून चालते. त्यामुळेही स्वप्नातले मैत्रकुल उभारतां येत नाही अशी माहीती छात्रशक्ती खजिनदार विजेता भोनकर यांनी दिली
मैत्रकुलचे विद्यार्थी स्वतः शिक्षण घेत ,वस्तीत,फुटपाथवर, सिग्नलवर मुलांना शिक्षण देत वाचन प्रचार प्रसार ,वक्षारोपण , आरोग्य जागृतीसारखी अनेक समाजोपयोगी कामं करत मैत्रकुल सांभाळण्याचे पण काम करत असतात परंतु स्वतःची जागा नसल्याने शेती,वाचनालय,अभ्यासीका,बुकबँक ,प्रयोगशाळा , कारखाना वगैरे अनेक गोष्टी उभारण्या करता मोठ्या जागेची गरज आहे म्हणून स्वतःची जागा उभारण्याचा संकल्प किशोरदा गणाई यांनी केला व त्याकरता कल्याण मैत्रकुल ते कुलाबा व्हिलचेअर यात्रा शिक्षणवारी सुरु करण्याचा निर्धार केला अशी माहिती कार्यवाह स्मिता साळंखे यांनी दिली.
या वारी दरम्यान शिक्षणबाह्य मुलीमुलांना शोधून त्यांना १७ नंबरचा फॉर्म भरुन वा मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून वयानुसार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व कोणत्या ठिकाणी बागशाळा , सिग्नलशाळा , वस्तीशाळा सुरु करता येईल याची चाचपणी करताना या शाळांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक व्यक्तींची यादी करून त्यांना प्रशिक्षण देणार असल्याची माहीती मंजीरी धुरी यांनी दिली.