वृत्तवाहिन्यांनी व्हिडिओ दाखवताना थोडी काळजी घ्यावी
मुंबई दि.१८: भाजप नेते किरीट सोमय्या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न होणार? जर ती पीडित महिला हे सगळं पाहत असेल तर त्यांनी सभागृहावर विश्वास ठेवायला हवा. तसेच वृत्तवाहिन्यांनी व्हिडिओ दाखवताना थोडी काळजी घ्यावी अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी उपसभापती याना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरावरून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा केली.
या मुद्द्यावर बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणारा आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं- मुली आणि बाकीची कुटुंब असते. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना बंधन सर्व माध्यमांनी गंभीरतेने पाळावे. पोलिसांचा तपास होईल त्यावेळी मिळणारी माहिती देखील माध्यमांनी काही मर्यादा पाळावी. पेनड्राईव्ह मला मिळाला आहे. त्यावरती आवश्यक कार्यवाही केली जाईल. हा व्हिडिओ संबंधीत चौकशी अधिकारी यांचेकडे पाठवला जाईल. या मधील महिलेची तक्रार आवश्यक आहे असे मत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
सभागृहातील चर्चा संबंधीत महिला माध्यामांमधून ऐकत असेल तर तिला याद्वारे आश्वस्थ करण्यात येते की तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा आपण सभागृहात बोलतो ते पीडीत महिला ऐकतात. ते ऐकून अनेक पीडित महिलांनी मला, फडणवीसांना संपर्क केला आहे. लोकांना अजूनही सभागृहावर विश्वास आहे ही मोठी गोष्ट आहे. यासाठी सर्वांनी हा महिलांचा या सभाग्रहावरील विश्वास दृढ होईल असे वर्तन ठेवणे आवश्यक आहे . या प्रकारांमध्ये गृहमंत्र्यांनी जी चौकशी जाहीर केली आहे त्यामध्ये नक्कीच सत्य बाहेर येईल असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.