विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपसभापतींकडे सादर केला पेनड्राइव्ह
मुंबई – भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून आक्रमक होत सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच सोमय्या यांच्या कथित ८ तासांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोपवला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची ग्वाही सभागृहात दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ सुचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, महामंडळांवर विविध पदांचा प्रलोभने दाखवून, ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला.
सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे, या विषयी तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. तसेच या पेनड्राइव्हचे अवलोकलन करून कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली. तसेच सोमय्या यांना केंद्राने दिलेले पोलीस संरक्षण तातडीने काढून टाकावे अशीही मागणी दानवे यांनी केली.
*’लाव रे तो व्हिडिओ’ ची घोषणा*
तसेच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. यावेळी विरोधकांकडून सभागृहात ‘लाव रे तो व्हिडिओ’ अशी घोषणाबाजी केली.
व्हिडिओ खरा आहे असल्याचे अप्रत्यक्षपणे सोमय्या यांनी मान्य केलंय : अनिल परब
अनिल परब यांनी विषयावर बोलताना सोमय्या यांनी अनेकांना खोटे आरोप करून त्रास दिला आहे. असे असले तरी त्यांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. हवं तर एसआयटी नेमावी. तसेच सोमय्या यांनी आज पत्र देऊन चौकशी ची मागणी केली आहे मात्र व्हिडिओ खोटा आहे असे म्हटलेले नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे, असं अप्रत्यक्षपणे सोमय्या यांनी मान्य केलं आहे, असे देखील ते म्हणाले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ..
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणी सोमय्या यांनी देखील माझ्याकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे. तुमच्याकडे कोणाची तक्रार असेल तर माझ्याकडे द्या. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीअंती कारवाई केली जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.