कल्याण : येथील आधारवाडी भागात राहत असलेल्या एका वकील महिलेच्या शाळकरी मुलाचे बुधवारी सकाळी अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण परिसरात शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. एस. पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून या प्रकरणाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागात महिला वकिल राहतात. त्यांचा १५ वर्षाचा मुलगा कल्याण मधील एका शाळेत सायकलवरून जातो. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता नेहमीप्रमाणे मुलाने आपल्या आईला मी शाळेत जात आहे, असे सांगून तो एकटाच सायकलवरून शाळेत जाण्यास निघाला.मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला असेल म्हणून पालक निश्चिंत होते. शाळा सुटल्यावर संध्याकाळी मुलगा घरी आला नाही म्हणून पालकांनी त्याचे मित्रांकडे, शाळेत चौकशी केली असता तो शाळेत आला नसल्याचे स्पष्ट झाले. पालकांनी मित्र मंडळी, नातेवाईक व शहरात मुलाचा शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागला नाही. मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करून मुलाची आई ॲड. हिमनील पवार यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
मोहन्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने गावात राहणाऱ्या वैशाली जयवंत खोलंबे (४५) या गृहिणीच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास १४ वर्षीय मुलगी प्रांजल ही कुणाला काही न सांगता काळा टी-शर्ट आणि काळी लेगिन्स परिधान करून घरातून निघून गेली. मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर हतबल झालेल्या पालकांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी उपनिरीक्षक ए. एस. पवार आणि उपनिरीक्षक एन. एस. लांडगे यांची नेमणूक केली आहे. त्यासाठी विशेष तपास पथके तयार करून अपहृत मुलांच्या शोधासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.