कल्याण : स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे आणि देशासाठी आपले योगदान दिलेल्या माजी सैनिकांचे कार्य अतुलनीय आहे. या माजी ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य करावे, असे विनंतीवजा आवाहन महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांनी आज महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात केले. यावेळी उपस्थित सैन्यदल, नौदल, हवाईदलातील माजी ज्येष्ठ अधिकारी वर्गाशी महापालिका आयुक्तांनी संवाद साधला. ज्येष्ठ नागरीकांच्या समस्यांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित ज्येष्ठांना दिले.
आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मारकास महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सर्व उपायुक्त, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क), सहा.आयुक्त व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते, सर्व उपस्थितांमार्फत हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत “तिरंगा प्रतिज्ञा” घेण्यात आली.
यासमयी पद्मश्री पुरष्कार विजेते गजानन माने, माजी आर्मी इंजिनिअर ए.व्ही.कंरदीकर, इंडियन नेव्हीचे माजी अधिकारी एस.बी.खांडेकर, एअरफोर्स चे माजी अधिकारी एन.एस.मानकर तसेच महापालिका अग्निशमन विभागात काम करताना एका दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या अग्निशमन अधिका-यांच्या जवळचे आप्तेष्ट जयेश शेलार, दिपा वाघचौडे, यज्ञेश आमले व पौर्णिमा कांबळे यांचा महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांचे हस्ते पुस्तक व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
शासनाच्या निर्देशानुसार आज महापालिकेमार्फत “हर घर तिरंगा” म्हणजेच “घरोघरी तिरंगा” या अभियानाचा प्रारंभही करण्यात आला. महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांचे हस्ते उपस्थित मान्यवरांना ध्वज विक्री करण्यात आले. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या शुभ्र फलकावर (कॅन्व्हासवर) “जय हिंद” व “घरोघरी तिरंगा” या शब्दांचे आरेखन करीत उपस्थितांनी आपल्या स्वाक्षरीची मोहर उमटविली.