कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न एरणीवर आला आहे.
महापालिका परिक्षेत्रातील जुन्या/अतिधोकादायक इमारती कोसळुन होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अश्या पालिकेकडून अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार हे पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये महापालिकेच्या सर्व प्रभागात बांधकाम उपअभियंता, नगररचना विभागाचा सर्व्हेअर, मालमत्ता विभागाचा भाग लिपिक आणि अग्निशमन विभागाचा स्थानक/उपस्थानक अधिकारी यांचा अंतर्भाव असणार आहे.

महापालिका परिक्षेत्रातील इमारती प्रथमदर्शनी अतिधोकादायक आहेत किंवा नाहीत हे निश्चित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान व कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक प्रभागनिहाय, संबंधित प्रभागातील अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करुन अहवाल सादर करण्याकामी वरीलप्रमाणे पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पथकाने तात्काळ कामकाजास सुरुवात करुन आपला एकत्रित अहवाल मुख्यालयात सादर करणेबाबत आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी निर्गमित केले आहेत.

सदर पथकाने दैनंदिन कामकाजाचा अहवाल त्याचदिवशी निदर्शनास आलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीसह संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना रोज सायंकाळी पाठवायचा आहे. संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी पथकाकडून माहिती प्राप्त होताच नियमातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!