घरत – पवारांना कुणाचे अभय ?  कारवाईसाठी आयुक्तांनी मागितला १५ दिवसाचा अवधी ! मनसेचे आंदोलन स्थगित 
कल्याण : बेकायदा बांधकाम प्रकरणी जबाबदार असणारे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, वादग्रस्त उपायुक्त सुरेश पवार आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असा ठराव महासभेने केलाय. मात्र या अधिकाऱ्यांवर  आयुक्तांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज  ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी कारवाईसाठी १५ दिवसाचा अवधी मगितल्याने मनसेने ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलंय. त्यामुळे आयुक्तांकडून या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याकडं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वांचेच लक्ष वेधलंय.
१९ मार्च रोजी महासभेत हा ठराव करण्यात आलाय. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून, त्यांची चौकशी करून दोषींच्या बडतर्फीचा प्रस्ताव महासभेत सादर करावा असे ठरावात नमूद करण्यात आलंय.  तसेच विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी नगरविकास खात्याकडे पत्रव्यवहार केला होता त्यावेळी नगर विकास विभागानेही सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश  महापालिकेला दिले आहेत. मात्र अजूनही पालिका आयुक्तांकडून कोणतीच दखल न घेतल्याने विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत मनसेच्या शिष्टमंडळाची आयुक्तांची भेट घडवून आणली. आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, माजी नगर सेवक सुदेश चुडनाईक, जनहित कक्षाचे उपाध्यक्ष संदेश प्रभूदेसाई, सागर जेथे, स्वप्नील वाणी, विशाल टोपले, शैलेंद्र सज्जे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!