महापौरांचा एक दिवस डोंबिवलीकरांसाठी …. पण मुहूर्त शोधताहेत
महापौर साहेब, चमकेशगिरी करायला येऊ नका …मनसेचा खरमरीत टोला
डोंबिवली : डोंबिवलीकरांचे गा-हाणे ऐकण्यासाठी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर हे आठवडयातील एक दिवस डोंबिवलीला देणार आहेत. पण तो दिवस कोणता वेळ कधी यासाठी अजूनही महापौर मुहूर्त शोधत आहेत. आजपर्यंत शिवसेनेच्या अनेक महापौरांनी डोंबिवलीला एक दिवस देण्याच्या वल्गना केल्या, पण तसे तुम्ही करू नका. डोंबिवलीत तुमचे स्वागतच आहे. आम्ही दिलेल्या डोंबिवलीचं समस्या अगोदर सोडवा. अन्यथा केवळ चमकेशगिरी आणि फोटोसेशन करून डोंबिवलीकरांच्या तोंडाला पाने पुसायला येऊ नका असा खरमरीत टोला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना लगावला आहे.
केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आठवडयातून एक दिवस महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात देण्याचे जाहीर केले आहे. पण कोणत्या दिवशी कधी येणार याबाबत अजूनही तारीख निश्चित झालेली नाही. यापूर्वी शिवसेनेच्या दहा वर्षाच्या सत्तेत अनेक महापौरांनी डोंबिवलीसाठी एक दिवस देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्या केवळ वल्गनाच ठरल्या. त्यामुळे देवळेकर यांची वल्ग्ना ठरू नये इतकीच अपेक्षा आहे असे कदम यांनी स्पष्ट केलय. डोंबिवलीच्या समस्यांबाबत महापौरांना अनेकवेळा निवेदन दिली आहेत त्यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. प्रभागात काम होत नाही म्हणून महापौर व त्यांचे सत्तेतील सहकारी आयुक्तांची खुर्ची उचलून विरोधी घेाषणा देतात ते डोंबिवली येऊन काय करणार ? फक्त दिखावाच का ? असा सवालही कदम यांनी उपस्थित केलाय.
महापौरांना दोन वर्षानी कशी आली आठवण
राजेंद्र देवळेकर हे महापौरपदी विराजमान होऊन दोन वर्षे झाली मात्र त्यावेळी डेांबिवलीत येऊन बसण्याची आठवण झाली नाही. आता एकदम कशी झाली, असा सवालही कदम यांनी उपस्थित केलाय. पुढच्यावर्षी निवडणुकांचे वारे वाहणार आहे. त्यामुळे कदाचित खासदारांचे आदेश असतील असा टोलाही त्यांनी महापौरांना लगावलाय.
महापौरसाहेब या समस्या सोडवल्या तरी खूप झालं …
१. खंबाळपाडा बस डेपो सुरू करा
२. डोंबिवली क्रिडासंकुलातील स्वच्छता राखा व जीममधील एसी सुरू करा
३. डोंबिवली-पनवेल, डोंबिवली-वाशी या बस सेवा शेड्युल प्रमाणे सुरू करा
४. महापालिका हद्दीतील पण एमआयडीसीच्या मालकीचे खड्डेमय रस्ते दुरूस्त करा
५. चिमणी गल्ली भाजी मार्केट मधील अनेक वर्ष रखडलेले पार्किंग सुरू करा..