शिवसेनेची रणरागिणी मैदानात
केडीएमसीच्या महापौर नर्सच्या भूमिकेत ….
कल्याण/ प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता विश्वनाथ राणे यांनी मंगळवारपासून नर्सची भूमिका पार पाडली. महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात त्यांनी करोनाबाधित रूग्णांची सेवा केली. त्यांनंतर करोनाबाधित रूग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर व नर्सचे मनोबल वाढविले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-19 या वैश्विक महामारीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयाशी संबंधितानी पुढे यावे, असे आवाहन जनतेला केले होते. त्यांच्या या आवाहनाचा सन्मानपूर्वक स्वीकार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता विश्वनाथ राणे यांनी आपली काम करण्याची तयारी असल्याचे दर्शविले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांच्या या भूमिकेचे जाहिर कौतुकही केले आहे. महापौर विनिता विश्वनािा राणे यांना मुंबई महानगर पालिकेच्या बी. वाय. एल नायर रुग्णालयात 32 वर्ष परिचारिका म्हणून काम केल्याने रुग्ण सेवेचा त्यांना प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी मुख्यमंत्रयाच्या आवाहनानुसार सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. महापौरांनी जाहीर केल्यानुसार त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्रीनगर कोविड-19 रुग्णालयात आपला पूर्वीचा परिचारिकेचा पेहराव अंगावर चढवून दाखल झाल्या. रुग्णालयात जाताना त्यांनी शासकीय वाहन व अंगरक्षक न घेता सर्वसामान्य परिचारिकेप्रमाणे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.पी.इ किट परिधान केला. या गणवेशात रुग्णांची पाहणी करून त्यांच्या आजारपणाची आस्थेवाईकपणे विचारपूस करून उपचाराबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांना आपापली काळजी घेण्यास सांगितले. महापौर प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी उतरून कामात सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांत आनंद पसरला. तसेच शहराच्या प्रथम नागरिक स्वतः रुग्णांसाठी धावून आल्याने पालिकेतील सर्वांचे मनोधैर्य वाढल्याची भावना व्यक्त झाली.