कल्याण डोंबिवलीत सेनेचाच महापौर : डोंबिवलीच्या  विनिता राणे नव्या महापौर तर उपमहापौरपदी उपेक्षा भोईर बिनविरोध !
कल्याण : कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेचा महापौर विराजमान झालाय. विनिता विश्वनाथ राणे या महापौरपदी तर भाजपच्या उपेक्षा भोईर या उपमहापौरपदी बिनविरोध निवडून आल्यात. राणे या तेराव्या महापौर ठरल्यात.
महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. यंदाच्या महापौरपदावर भाजपनेही दावा केला होता. मात्र पालिकेची आर्थिक तिजोरी समजली जाणारी स्थायी समितीचे सभापतीपद आणि परिवहन समिती सभापती ही महत्वाची पद भाजपकडं आहेत. त्यामुळे  यंदाच महापौरपद शिवसेनेकडचं असाव अशी मागणी सेनेकडून करण्यात आली होती. या मागणीला भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून दुजोरा मिळाला होता. त्यानुसारच महापौरपदासाठी शिवसेनेने विनिता राणे यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपच्या उपेक्षा भोईर यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदासाठी अर्ज सादर केलेत होते. तर शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज भरला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. अखेर भोईर यांनी महापौरपदाच्या तर तानकी यांनी उपमहापौर पदाचा अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
—–
पावसाळीपूर्व कामांसह प्रलंबित कामांना प्राधान्य – विनिता राणे
शहरातील प्रलंबित कामांना आपण प्राधान्य देऊच परंतु पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळी पूर्व कामानाही प्राधान्य देण्यात येईल  असा विश्वास कल्याण डोंबिवलीच्या नवनिर्वाचित महापौर विनिता विश्वनाथ राणे यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदी राणे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. पावसाळा तोंडावर असल्याने नाले, गटारांची साफ सफाई, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. तर 27 गावांतील प्रश्न, कल्याण डोंबिवलीतील प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण विशेष लक्ष घालणार असल्याचेही महापौर राणे यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र असे काम करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले.
***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *