केडीएमसीच्या आवारातील मंदिरावर पालिकेचा हातोडा

कल्याण (सचिन सागरे) :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आवारात अनेक वर्षापासून असलेल्या गोरखनाथ मंदिरावर पालिकेच्या क प्रभाग क्षे़त्र कार्यालयाने संध्याकाळी पोलीस बंदोस्तात  कारवाई करून जेसीबीच्या साहययाने जमीनदोस्त केले.  दरम्यान हे मंदिर तोडण्यास वाल्मीकी समाजाने कडाडून विरोध केला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील अनधिकृत मंदिरावर कारवाई करण्यात येत होती. त्यातील अनधिकृत मंदिरांच्या यादीत हे मंदिर असल्याने त्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.

सन १९१५ साली मंदिराची स्थापना करण्यात आली असून मंदिराचा १९८८ मध्ये जिर्णोधार करण्यात आला. जिर्णोधाराचे भूमिपूजन तत्कालीन आमदार राम कापसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर मूर्ती स्थापना तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आली हेाती.  गोरखनाथ आणि गोगादेव या देवांच्या मुर्त्या मंदिरात स्थापित होत्या. दरम्यान हे मंदिर ऑगस्ट महिन्यात कारवाईचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र वाल्मिकी समाजाच्या प्रचंड विरोधामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. अनेक दिवस समाज बांधवांनी मंदिर परिसरात पाहरा दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारातच प्रशासकीय भवनाला लागूनच हे मंदिर  होते. आज अखेर पोलिस बंदोबस्तात मंदिरावर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस व महापालिका अधिकारी यांना कारवाईस समाजाचे नेते चरणसिंग टाक यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी आदेशाची प्रत नसताना कारवाई कशाच्या आधारे करता असा सवाल उपस्थित केला. दरम्यान महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रचंड पोलीस बंदोवस्तात जेसीबीच्या सहाय्याने  ही कारवाई करण्यात आली. दरम्यान कारवाईपूर्वी मंदिरातील गोरक्ष नाथ आणि गोगा देवाची मूर्ती भक्तांनी बाहेर काढल्यानंतर मंदिर जमीनदोस्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *