केडीएमसीत भाजप नगरसेवकांची कामे होत नाहीत
भाजपचे गटनेता विकास म्हात्रे यांचा संताप 

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसी आयुक्त हे तिजोरीत निधी नसल्याचे कारण देत नगरसेवकांना कामे करण्यास नकार देत असल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. गेल्या चार वर्षापासून विकास कामांची फाईल मंजूर हेात नसल्याने नगरसेवक त्रस्त झाले आहेत.  महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असतानाही भाजप नगरसेवकांची कामे होत नसल्याने  भाजपचे गटनेता विकास म्हात्रे यांनी शनिवारी महासभेत तहकुबी मांडली. यावेही  म्हात्रे यांना सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठींबा मिळाल्याने अखेर प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्यात आली.
शनिवारच्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गेल्या चार वर्षापासून पाण्याची फाईल मंजूर हेात नसल्याने बसपा नगरसेविका सोनू अहिरे यांनी आवाज उठवल्यानंतर भाजपचे गटनेता विकास म्हात्रे यांनी नगरसेवकांची कामे होत नसल्याने सभा तहकुबी मांडली होती. या तहकुबीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठींबा दर्शविला.  जनतेच्या प्रश्नांना नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या समस्या सोडविल्या जात नसतील तर निवडून येऊन उपयोग काय ? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला. चार वर्षे होऊनही आर्थिक कारण पुढे करीत प्रशासन फाईल मंजूर करीत नसल्याने नगरसेवकांची कामे रखडली आहेत. मग जनतेची कामे कशी होणार ? असा सवाल म्हात्रे यांनी केला. महासभेच्यापूर्वी  महापौरांच्या राउंड टेबलवर झालेल्या महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीतूनही नगरसेवक म्हात्रे यांनी सभात्याग करून नाराजी दर्शविली होती. भाजपच्या गटनेत्यांनेच तहकुबी मांडल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवकही आक्रमक झाले होते.  सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.  २७ गावे समाविष्ठ केल्यानंतर हद्दवाढीचे अनुदान पालिकेला देण्यात आलेले नाही तसेच साडेसहा हजार कोटीचे पॅकेज देण्यास टाळाटाळ केली जात आहे अशी नाराजीनगरसेवकांनी व्यक्त केली. तसेच  मालमत्ता कराची वसुली होत नसल्याची ओरडही अनेक नगरसेवकांकडून करण्यात आली. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांचा ओपन लॅण्ड टॅक्स संदर्भात बिल्डरांची ५३५ कोटी रूपयांच्या थकबाकीसंदर्भात लढा सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे कोटयावधी रूपयांचे नुकसान होत आहे याबाबत त्यांनी लोकायुक्तांकडेही तक्रार केली आहे. मात्र त्या थकबाकीसंदर्भात एकाही नगरसेवकाने अवाक्षरही काढले नसल्याने  आश्चर्य व्यकत होत आहे. 

—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *