कडोंमपाची आर्थिक स्थिती खालावली; येत्या वर्षातही नविन विकासकामांना लावावा लागणार ब्रेक
कल्याण (प्रविण आंब्रे): कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे चालू आर्थिक वर्षात कोणतेही भांडवली काम हाती घेता येणार नाही. त्याचप्रमाणे पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०१८ – २०१९ या कालावधीतही कोणतेही नविन काम प्रस्तावित करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पटलावर ठेवण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू यांनी महापालिकेच्या आर्थिक सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा आर्थिक अहवाल तयार केला आहे. त्यावरून महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा ताळमेळ पाहता नविन कामे घेण्याच्या इच्छेला लोकप्रतिनिधींना आवर घालावा लागणार आहे.
आयुक्तांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, सन २०१७ – २०१८ मध्ये कोणतेही नविन भांडवली काम हाती न घेता आवश्यक निधीसाठी तब्बल ३४७ कोटी रक्कमेची तूट निर्माण होणार आहे. एवढेच नाही तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे सन २०१८ – २०१९ मध्ये सुद्धा कोणतेही नविन काम प्रस्तावित न करताही ३६५.५० कोटी रुपयांची तूट निर्माण होणार आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, महत्वाच्या योजनांसाठी चालू आर्थिक वर्षात २८५ कोटी इतका निधी द्यावा लागणार आहे. प्रत्यक्षात मात्र ५१.५४ कोटी रुपयेच देता येणे शक्य आहे. निर्माण होणारी तूट नविन कर्ज वा अन्य मार्गाने भरून काढावी लागेल. तसेच उर्वरित आवश्यक निधी पुढील आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे लागणार, असेही वेलरासू यांनी अहवालात म्हटले आहे.
भांडवली कामाच्या दायित्वाचा तपशिल
शहर अभियंता व जल अभियंता यांनी दिलेल्या कामांचे शिल्लक दायित्व अनुक्रमे २७५ कोटी व १६ कोटी असे एकूण २९१ कोटी इतके आहे. तसेच शहर अभियंता यांच्याकडील निविदा स्तरावरील कामांचे संभाव्य दायित्व १८३ कोटी आहे. शिवाय प्रशासकीय मान्यता असलेल्या परंतु निविदा काढणे शिल्लक असलेल्या कामांचे संभाव्य दायित्व ४६४ कोटी आहे. आजमितीस लेखा विभागाकडे सुमारे ५२ कोटींची देयके निधी अभावी प्रलंबित आहेत.
मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना परत पाठवा
मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांना शासनाकडे परत पाठविण्याचा ठराव पालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी याच महासभेत मांडला आहे. महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे नियोजन नसल्यामुळे आणि आर्थिक स्थिती नाजूक होण्यास जबाबदार असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्यावर कारवाई करून त्यांची चौकशी प्रस्तावित करावी, अशी मागणी पालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी यापूर्वीच आयुक्तांकडे केली होती. मागील ३ वर्षात महापालिकेची नाजूक झालेली आर्थिक स्थिती, दायित्व, कोणती कामे प्राधान्याने घ्यावीत, १० वर्षे उलटूनही एक्ष्ट्रा आयटम भाववाढखाली सुरु असलेली कामे याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी किती वेळा आयुक्त व लोक प्रतिनिधींना जाणीव करून दिली, असा सवाल मोरे यांनी विचारला होता.
–