सिटीझन रिपोर्टर दि.11 ऑक्टोबर :गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे कामगारांनी आज कामबंद आंदोलन छेडले सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे रस्त्यावर कच-याचे ढीग पसरले आहे. ऐन सणासुदीच्याकाळात कच-याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सफाई कामगारांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या मुद्द्यावर मनसेने काही दिवसांपूर्वीच केडीएमसी प्रशासनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दर महिन्याच्या 10 तारखेला या कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल असे लेखी आश्वासन केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिल्याची माहिती मनसे कामगार सेनेच्या उल्हास भोईर यांनी दिली.
गेल्या महिन्यात गणेशोत्सव झाल्यानंतर या कामगारांना वेतन देण्यात आले होते. तर ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक 10 तारखेला वेतन दिले जाईल असे लेखी देऊनही आज 11 तारीख आली तरी अद्याप वेतन मिळाली नसल्याची माहिती उल्हास भोईर यांनी दिली आहे. केडीएमसी उपायुक्त अतुल पाटील यांच्या या वागणुकीविरोधात कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही तोपर्यंत हे सामूहिक सुट्टी आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.