केडीएमसीच्या 3 कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक
आजपर्यंत २९ कर्मचारी एसीबीच्या जाळयात
कल्याण (आकाश गायकवाड) : महापालिकेच्या नाले सफाईच्या कामाचे बिलासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी ४० हजार रुपयाची लाच घेताना पालिकेच्या अ प्रभागातील 2 स्वच्छता निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी साेमवारी अ प्रभाग क्षेत्र कार्यालयात रंगेहाथ अटक केली आहे. आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे, शिपाई विजय गायकवाड, आणि आरोग्य निरीक्षक संजय धात्रक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आजवर विविध खात्यातील तब्बल २६ कर्मचारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले असताना आज पुन्हा 3 अधिकारी कर्मचारी अडकल्याने त्यामुळे लाचखोराची संख्या आता २९ वर पोहचली आहे .
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता .यानंतर नाले सफाईची बिले काढताना संबधित प्रभागातील नगरसेवकाचे आणि प्रभाग क्षेत्रात्रील घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षकाचा ना हरकत दाखल्यासह ठेकेदारांना बिले सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यामुळे आता नाले सफाईची बिले काढण्यासाठी तक्रारदार ठेकेदाराने महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक धात्रक आणि ठाकरे यांच्याकडे ना हरकत दाखला देण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी ठाकरे यांना २५ हजार तर इतर दोघांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याची मागणी केली तडजोडी अंती हि रक्कम एकत्रित ४० हजार देण्याचे ठरले. अखेर सदर रक्कम स्वीकारण्याचे आरोपिनि मान्य केल्यानंतर आज संबधित ठेकेदाराकडून अ प्रभाग क्षेत्र कार्यालयातच ४० हजार लाच स्वीकारण्याची जबाबदारी शिपाई गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली. गायकवाड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले यावेळी ठाकरे आणि धात्रक यांनी कार्यालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अधिक चौकशीसाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात नेत अटक केली.कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकार्याना छोट्या मोठ्या कामासाठी पैसे खाण्याची लागलेली सवय काही करून कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.