डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीत मतदार यादीतून त्या प्रभागातील नावे दुस-या प्रभागात समाविष्ट केल्यानंतर हरकती नोंदविण्यात आल्यानंतरही यातील काही नावांचा समावेश करून हजारो नावे समाविष्ट करण्यात आलेली नाही. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप शिवसेना युवासेनेचे अनमोल वामन म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता गोरखनाथ म्हात्रे यांनी केलाय. पालिकेतील निवडणूक अधिकाऱ्यांच्या या कामाविषयी आता राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाद मागितली आहे. याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास येत्या १५ ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राच्या माध्यमातून म्हात्रे कुटुंबीयांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मतदार यादी प्रभाग क्र. २८ च्या चतु:सीमेच्या आत राहत असलेल्या मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आली होती. ही नावे प्रभाग क्र. २८ मध्ये घेण्याकरिता हरकती घेण्यात आलेल्या होत्या मात्र त्यामधील ६० टक्के नावे प्रभाग क्र. २८ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. तसेच ठाकुर्ली, भरत भोईर नगर, उमा स्मृति यातील प्रभाग क्र. २८ मधील मतदार हे प्रभाग क्र. ३२ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या मतदारांची नावे प्रभाग क्र २८ मध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
ही नावे वगळण्यात यावी…
प्रभाग क्र. २८ च्या चतुरसीमेच्या आत राहत नसलेली नावे भाग यादी क्र.१८, ८७, ९१, ९३, ९५, १६२ हे मतदार वगळण्यात यावी.उपरोक्त यादीमध्ये मतदार रहात असलेल्या पत्त्यावरील अक्षांश व रेखांश यांची चतु:सीमा न पाहता किंवा प्रत्यक्षात जागेवर न जाता त्याचप्रमाणे आपल्याकडे केलेल्या तक्रारींचा राग मनात ठेऊन मुद्दामून केलेल्या हरकतीकडे दुर्लक्ष केले गेले आहे असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
प्रभाग क्र.२८ अंतर्गत विभागात रहात असलेल्या ३१०३ मतदारांनी हरकती घेतल्या त्यातील १३०० लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली परंतु १८०३ मतदारांची नावे जाणूनबुजून घेण्यात आलेली नाही असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे