नव्या आयुक्तांना पहिलाच झटका : २७ गावाचा दौरा रोखला , अव्वाच्या सव्वा मालमत्ता कराची केली होळी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ही २७ गावाला कोणत्याच सोयी सुविधा मिळत नसल्याने नव्या आयुक्तांचा दौरा गावकर्यांनी रोखला. २७ गावाची स्वतंत्र नगरपालिकेची मागणी करीत, ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराची होळीदेखील केली.
२७ गावाची स्वतंत्र नगरपालिकेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. महापालिकेत नुकतेच आलेले नविन आयुक्त गोविंद बोडके यांंनी २७ गावांचा पाहणी दौरा आयोजित केेला होता. या पाहणी दौऱ्यानंतर वेळी २७ गाव संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांचा ताफा रोखला. आणि नंतर काटई पोलीस चौकीमध्ये पालिका आयुक्तांना घेराव घातला. यावेळी २७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांवर आरोग्य यंत्रणा, शाळा, पायाभूत सुविधा, वाढवून आलेली मालमत्ता कराची बिलं आदीं प्रश्नांची सरबत्ती केली.
त्यावर संघर्ष समितीचे जे काही म्हणणे असेल ते आपण नक्कीच शासनाला कळवू असे उत्तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान आयुक्तांशी बोलणी झाल्यावर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी बाहेर येत महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या बिलाची होळी करून आपला रोष वाक्य केला. तसेच 27 गावांची वेगळी नगरपालिका करा. तोपर्यंत कोणीही मालमत्ता कर भरणार नाही या घोषणेचा पुनरुच्चारही केला. यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये गंगाराम शेलार, गुलाब वझे, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, दशरथ पाटील, विजय भाने, गजानन मंगरुळकर, भगवान पाटील, दत्ता वझे, वासुदेव गायकर, कृष्णाबुवा मढवी, सुधीर पाटील, गजानन पाटील, यांच्यासह 27 गाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.