कल्याण- डोंबिवली महापालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १८२ कोटींचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सभागृहात सादर केला. आयुक्त प्रशासक असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला त्यांच्या अधिकारात तात्काळ मंजूरी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा सुविधासह महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा कोणतीही कर वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेचे उत्पन्नाच्या स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ७०० कोटी ठेवण्यात आले आहे. मालमत्ता वसुलीच्या बाबतीत विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले. आरोग्य सेवा सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची भरती, डोंबिवली पूर्वेत कॅन्सर सेंटरसह पालिकेच्या रुग्णालयीन सुविधा सुसज्ज करण्यासाठी तरतूद आयुक्तांनी केली आहे. याचवेळी शहरातील स्वच्छता आणि महिला विकासावर विशेष भर देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी क्रीडा सुविधांवर भर देण्यात आला. शहरात उद्याने व मैदानाच्या सुरक्षितेसाठी पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. उद्यान, वृक्ष संवर्धनासाठी तब्बल १७ कोटी २१ लाखांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नेतीवली येथे हिंदी भाषी भवन, कल्याण पश्चिम येथे आगरी कोळी कुणबी सांस्कृतिक भवन वारकरी भवन हे उभारण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरणासाठी उपक्रम हाती घेण्यात आले. महापालिका शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई या परीक्षेसाठी तसेच एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा करता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करून त्या अंतर्गत आर्थिक सहाय्य्य देण्यात येणार आहे.

अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्टये …

१) तलाव सुशोभिकरण व संवर्धन – रु. 41 कोटी.

२) स्मशानभुमी व अंत्यविधी स्थाने – महसुली रु. 5 कोटी व भांडवली रु. 2.50 कोटी.

३) नाट्यगृहे (रंगमंदिर)/क्रीडा केंद्राची व्यवस्था – रु. 9 कोटी.

४) उड्डाणपुल – रु. 30.00 कोटी.

५) विद्युत व्यवस्था – महसुली रु. 35 कोटी व भांडवली रु. 14 कोटी.

६) अग्निशमन – महसुली रु. 9 कोटी व भांडवली रु. 20 कोटी.

७) मुलभूत सोयी सुविधा, एमएमआरडीए, खासदार-आमदार निधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना इ. – शासन अनुदानातंर्गत विविध कामे करण्यात येणार असून, त्यापोटी रक्कम रु. 445 कोटी तरतुद करण्यात आली आहे.

८) रुणालये व दवाखाने – महसुली रु. 29.05 कोटी.

९) सार्वजनिक स्वच्छता व‍ घनकचरा व्यवस्थापन – महसुली रु. 147 कोटी व भांडवली रु. 80.50 कोटी.

१०) प्रार्थमिक शिक्षण – महसुली रु. 81 कोटी व भांडवली रु. 1.50 कोटी.

११) दुर्बल घटक, शहरी गरीब – रु. 15 कोटी महसूली व रु. 34 कोटी भांडवली.

१२) महिला व बाल कल्याण कार्यक्रम – रु. 12.11 कोटी.

१३) दिव्यांग कल्याण व पुर्नवसन कार्यक्रम – रु. 12.25 कोटी.

१४) क्रीडा व सांस्कृतीक – रु. 2 कोटी.
परिवहन व्यवस्था – रु. 66 कोटी.

१५) पाणी पुरवठा – महसुली रु. 154.30 कोटी व भांडवली रु. 461.40 कोटी.

१६) जलनि:सारण व्यवस्था – महसुली रु. 2.50 कोटी व भांडवली रु. 5 कोटी.

१७) मलनि:सारण व्यवस्था – महसुली रु. 37.10 कोटी व भांडवली रु. 45 कोटी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *