मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी दिनांक २५ जून रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात सिद्धरामय्या यांचे योगदान मोठे आहे. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार सिद्धरामय्या यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच सिद्धरामय्या सांगली येथे महानिर्धार २०२४, शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत.

काँग्रेस पक्षाने सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. प्रभारी व कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आ, प्रणिती शिंदे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विक्रम सावंत यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बंगळुरु येथून सकाळी १० वाजता विशेष विमानाने निघतील व कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराज विमानतळ येथे ११.१५ वाजता आगमन होईल. तेथून ते मोटारीने सांगलीकडे प्रयाण करतील व १२.१० वाजता सांगलीत आगमन होईल. सांगलीत जाहीर सत्कार व सभेला ते उपस्थित राहतील. दुपारी २.०० वाजता ते कोल्हापूरकडे प्रयाण करतील व कोल्हापूरहून २.४५ वाजता विमानाने बारामतीकडे प्रयाण करतील. बारामतीत ३.३० वाजता आगमन होईल व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील त्यानंतर ५.३० वाजता बारामतीहून बंगळुरुकडे विमानाने प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!