कर्जत (राहुल देशमुख) : रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडानी भ्याड हल्ला केला आहे. यात महाजन जखमी झाले आहेत. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना देखील त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याची खेदजनक वास्तव वारंवार समोर येत आहे. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम देशमुख यांनी राज्यातील सर्व पत्रकार संघटनांना याबाबत निषेध व्यक्त करत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज रायगड प्रेस क्लब संलग्न कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कर्जत टिळक चौक येथे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत संदीप महाजन यांना शिवीगाळ करून मारहाण करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत कर्जत तहसीलदार याना निवेदन सादर केले आहे.
देशभरात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. तर देशाचा चौथा स्तंभ असलेल्या या पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्यात ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला. यामुळे आता तरी पत्रकार सुरक्षित राहतील असे वाटत असताना शासनकर्त्यांनी या कायद्यात अनेक पळवाटा ठेवल्या. तर पत्रकारांवर हल्ला झालेला असताना पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करताना पोलीस देखील हजार प्रश्न विचारतात. तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी काही तासात मोकाट फिरायला मोकळा होतो त्यामुळे या कायद्याचा धाक कुणाला राहिलेला नाही अशी स्थिती आहे. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे.
जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांनी काही दिवसांपूर्वी एका घटनेबाबत विश्लेषण करत बातमी केली होती. त्यावेळी हि बातमी तेथील पाचोर्याचे आमदार किशोर अप्पा पाटील यांना चांगलीच झोम्बली होती. त्यामुळे महाजन यांना आमदार पाटील यांनी फोन करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच तुला बघून घेतो असे म्हणाले होते. त्याच्यानंतर महाजन यांना शहरातील चौकामध्ये आमदार पाटील यांच्या गुंडानी भररस्त्यात मारहाण केली. हि घटना संबंध महाराष्ट्राने पहिली असे असताना देखील आमदार किशोर अप्पा पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे जर कायदा असून देखील एक आमदार संबंध महाराष्ट्रासमोर आपण केलेल्या शिवीगाळ कृत्याचे समर्थन करत असेल तर याहून खेदजनक बाब कोणतीही नाही. तेव्हा या घटनेच्या निषेधार्थ मात्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेसह राज्यातील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांनी एकत्र येत आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. तर पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार कर्जत टिळक चौक येथे आज कर्जतमधील पत्रकार जमत त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत पत्रकारांनी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली. तदनंतर कर्जत तहसील कार्यालय येथे जाऊन पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करत मारहाण करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्री यांच्यानावाने निवेदन सादर केले. हे निवेदन तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी स्वीकारले.