कृष्णजन्माष्टमीची ८८ वर्षाची परंपरा,
राऊत कुटुंबियांची ४ थी पिढीचा उत्सव
कर्जत (राहुल देशमुख) : गेली ८८ वर्षापासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची थी पिढी सहभागी झाली आहे. कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमिच्या दिवशी साजरा केला जातो.या उत्सवाला गावातील व परिसरातील बाळगोपाळ , तरुण मंडळी, महिला वर्ग, व जेष्ट नागरिक मोठया संख्याने हजेरी लावतात.
या गोपाळकाला उत्सवाबाबत गावातील बुजुर्ग मंडळींच्या माहितीनुसार आणि राऊत कुटुंबियांच्या घरातील श्रीमती सुशीला महादू राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्या या घरात सून म्हणून येण्यापूर्वीपासून हा उत्सव होत असल्याचे सांगतात. त्यांचे सासरे कै. गोपाळ वाळकू राऊत हे गणेश उत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन उल्हासनदीच्या पात्रात केल्यानंतर मुठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर आशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली . त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेऊन पूजाविधी केली. आणि त्यानंतर पुढे जन्माष्टमिचा उत्सव सुरु झाला. आज या उत्सवाला ८८ वर्ष पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले.जन्माष्टमिच्यादिवशी नदीच्या पात्रात सापडलेल्या कृष्णमूर्तीची पूजाविधी केली जाते. व रात्री १२ वाजता ती मूर्ती पाळण्यात ठेऊन पाळणा म्हटला जातो. गावातील सर्व मंडळी उत्सवाला हजेरी लावतात. दिवसभर भजन हरिपाठ व रात्री आरती झाल्यावर कृष्णपाळणा सादर केला जातो. यावेळी दहीपोह्यांची उधळण करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो.
या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दांपत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे या उत्सवात बाळगोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दांपत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात. उत्सवाच्या दुसरया दिवशी मानाची दहीहंडी फोडल्यानंतर गावातील बाळगोपाळ उर्वरित हंड्या फोडतात.
**