ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन
पुणे ; मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या.
अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. सामना, हा खेळ सावल्यांचा, महेक अशा सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सखाराम बाईंडर, रथचक्र, कमला या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्व आपण गमावले
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई,: मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती लालन सारंग यांच्या निधनाने कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्रीमती सारंग यांचा रंगभूमीवरचा समर्थ वावर कायम प्रयोगशीलता जपणारा होता. प्रवाहाच्या विरुद्ध असलेल्या भूमिका साकारण्याचे आव्हान पेलण्याचे धाडस दाखवताना त्यांनी आपली अभिनयक्षमताही सिद्ध केली. यामुळे त्यांची कारकीर्द एक अमीट ठसा उमटवणारी ठरली. ‘सखाराम बाईंडर’मधील त्यांची भूमिका रसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहिल. जवळपास पाच दशकांचा त्यांचा कलाप्रवास हा मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारा ठरला असून त्यांच्या निधनाने आपण एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे.
—–000—–