काकोळेवासियांची पाणी समस्या सोडविण्यासाठी शिवनलिनी प्रतिष्ठानकडून मदतीचा हात
अंबरनाथ :- येथील काकोळे गावातील रहिवाशी गेल्या अनेक महिन्यापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र पाणी समस्येवर आवाज उठवणारे गावकरी व नाट्य कलाकार नरेश गायकर यांना धमकवण्याचा प्रकार घडला आहे. मात्र पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व गायकर याना कायदेशीर संरक्षण मिळण्यासाठी डोंबिवलीतील शिवनलिनी प्रतिष्ठानने मदतीचा हात दिलाय.
काकोळे गावातील रहिवाश्यांना पाणी समस्येला तोंड दयावे लागत असल्याने गावातील रहिवाशी नरेश गायकर यांनी पाणी पुरवठा योजनेची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली होती. तसेच प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र गावातील काही लोकांना याचा राग आल्याने गायकर यांना धमकावण्यात आले. गावात मोठ्या प्रमाणावर आदिवासी वस्ती असून त्यांच्यावर देखिल दबाव टाकण्यात आला. गावाच्या शेजारी काकोळे तलाव असतानाही गावकरी मात्र तहानलेले आहेत. गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी शिवनलिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज काकोळे गावाला भेट दिली. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. पाणी समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी कुलकर्णी यांनी दिले.