कचरा प्रश्न पेटला, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा कल्याणकरांचा इशारा
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार गोविंद बोडके यांनी सोमवारी स्वीकारला. मात्र आयुक्तांना पहिल्याच दिवशी कल्याणकरांचा आंदोलनाला सामोरे जावे लागले. एकीकडे कचरा प्रश्नाने पेट घेतल्याने कल्याणकरांनी रस्त्यात उतरून मूक मोर्चा काढला. येत्या काळात कचऱ्याचा प्रश्न न सुटल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही कल्याणकरांनी दिला. तर दुसरीकडे सोयी सुविधा मिळत नसल्याने अनोखे ढोल ताशा आंदोलन केले. त्यामुळे नव्या आयुक्तांपुढं या समस्या ओढविण्याचे मोठं आव्हान उभं ठाकलय.
गेल्या आठवड्याभरापासून कचरा डेपोला लागलेली आग आणि त्या धुरापासून गुदमरलेले कल्याणकर सोमवारी पुन्हा एकदा एकवटलेले पाहायला मिळाले. लालचौकी जवळील फडके मैदानातून मूक मोर्चा काढत त्यांनी पालिकेविरोधात एल्गार पुकारला. प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. डम्पिंगची समस्या न सुटल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना इशारा ठरलाय. आधारवाडी डम्पिंगची कचरा साठवण्याची क्षमता संपल्याने मुंबई उच्च न्यायालयाने डम्पिंग ग्राउंड बंद करून पालिकेच्या आरक्षित जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने साकारण्याचे निर्देश दिलेत. पण अनेक वर्षांपासून ही समस्या जैसे थे आहे. आता या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात ही समस्या चांगलीच पेटण्याची शक्यता आहे.
ढोल-ताशा वाजवून पालिकेला केलं जाग !
कल्याण : महापालिकेचे सर्व कर भरून सुद्धा जनतेला पालिकेकडून कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सेवा सुविधा नाही, तर कर नाही असा पवित्रा अनेक दिवसांपासून कल्याणकरांनी घेतलाय. तरीसुद्धा पालिकेला जाग येत नसल्याने कल्याणकरांनी ढोल -ताशा वाजवून अनोखे आंदोलन केलं. कल्याणातील जागरूक नागरिक श्रीनिवास घाणेकर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन सुरू आहे. एकीकडे पालिकेत भ्रष्ट आणि ढिसाळ कारभार सुरू आहे. तर दुसरीकडे पालिकेकडून नागरिकांना कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून सेवा सुविधा नाही तर कर नाही हे असहकार आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनातील ढोल ताशा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. मात्र आगामी काळात परिस्थिती न बदलल्यास सर्व प्रभाग समिती कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल अशी माहिती आंदोलांकर्त्यांनी यावेळी दिली.
काय म्हणाले नवे आयुक्त
सामान्य नागरिक हा केंद्र बिंदू मानून, उत्तम सुविधा पुरविण्यांवर आपला भर राहील. स्थानिक नागरी प्रश्नांची माहिती घेवुन, महापालिकेचे प्रकल्प मार्गी लावु असे आश्वासन
नवनियुक्त आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिले. बहुतांशी सेवा ठाणे जिल्ह्यात झाल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेची भौगोलिक माहिती आहे. रखडलेली कामे मार्गी लावले जातील. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
https://youtu.be/zD8vm7OURU4