२९ ऑगस्ट रोजी “पाण्यासाठी, पाण्यात , पाणीविना आंदोलन करण्याची घोषणा
कल्याण : देशभरात रक्षाबंधन नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, मात्र कल्याणात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. कोट्यवधी लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी वाचविण्यासाठी, प्रदूषण मुक्त होण्यासाठी आज कल्याणकरांनी उल्हासनदीला नारळ व फुल अर्पण करून नदी वाचविण्यासाठी शक्ती द्यावी अशी विनवणी केली. नदी वाचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर २९ ऑगस्ट रोजी “पाण्यासाठी, पाण्यात , पाणीविना आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आलीय.
उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन निकम अनेक वर्षांपासून प्रशासनाशी लढा देत आहेत. मात्र प्रशासनाकडून अजूनही कोणतीच कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी माजी नगरसेवक नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर आणि मी कल्याणकर संस्थेचे पदाधिकारी यांनी उल्हास नदी वाचविण्याच्या आंदोलनाला बळ मिळावं यासाठी उल्हास नदीत नारळ फुल अर्पण करून आशीर्वाद मागितला. आजच्या दिवशी प्रत्येक भाऊ हे आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. उल्हास नदीला उमाई या नावाने देखील संबोधले जाते. त्यामुळेच आम्ही उल्हास नदीच्या रक्षणासाठी आशीर्वाद मागितला असे निकम यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील साधारण १ कोटी नागरिक या उल्हास नदीचे पाणी पितात. केमिकलयुक्त सांडपाणी , मलमूत्र , अनेक मेलेली छोटीमोठी जनावरे ही सांडपाण्याच्या नाल्याद्वारे आजही कुठलीही प्रक्रीया न करता सर्रासपणे या नदीत सोडले जात आहेत. रात्रीच्या अंधारात अनेक केमिकलयुक्त टँकर या नदीत सोडले जातात. उल्हास नदी ही खूप मोठया प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. नदीच्या रक्षणासाठी आम्ही गेले अनेक वर्षांपासून मनापासून पाठपुरावा करतोय , या नदीसाठी अनेक आंदोलने केलीत उपोषण , धरणे आंदोलन केली , संबधीत सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा देखील आमच्यावर दाखल झाला आहे व या केसमध्ये आजही आम्ही कोर्टाच्या खेपा मारतोय. पण आजवर कल्याण – डोंबिवली महापालिका व उल्हासनगर महापालिकेचे संबंधित अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत या गोष्टीचे वाईट वाटतंय अशी खंत माजी नगरसेवक नितीन निकम, कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना अधिकारी जुमानत नाही
या गंभीर समस्येवर उपाययोजना कराव्यात यासाठी या नदीवर प्रत्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे , तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रविंद्र चव्हाण , तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे , मनसे आमदार राजुदादा पाटील , प्रकाश भोईर , आमदार गणपत गायकवाड , विश्वनाथ भोईर, निरंजन डावखरे, ओमी कलानी, माजी आमदार नरेंद्र पवार , जगन्नाथ शिंदे , व अनेक नगरसेवक , राजकीय नेते , सामाजिक संस्था व अनेक नदीप्रेमी लोकांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या असतांना देखील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी या कामात चालढकल करीत आहेत. त्यामुळे उल्हास नदीच्या रक्षणासाठी २९ ऑगस्टला “पाण्यासाठी, पाण्यात , पाणीविना आंदोलन करण्यात येणार आहे असे निकम यांनी सांगितले.
—–