डोंबिवली :  घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅस गळती होऊन घरात स्फोट होऊन गंभीररित्या भाजलेल्या   मनसेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल विखणकर यांचा गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल या ८० टक्के भाजल्या होत्या नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.    

खडकपाडा येथील राहत्या घरात गेल्या शुक्रवारी दुपारच्या वेळेत जेवण करीत असतानाच अचानक सिलिंडरमधून गॅस गळती होऊन  झालेल्या स्फोटात शीतल विखणकर ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना प्रथम कोन येथील वेद रूग्णालय, त्यानंतर नवी मुंबईतील बर्न रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून शीतल यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. 

पोलीस तपासात आता नवीन  माहिती पुढे आली आहे. शीतल या भिवंडी जवळील कोन येथील एका घरात भाजल्या होत्या. यावेळी त्यांचा वाहन चालक अविनाश पाटील तेथे उपस्थित होता. त्याने शीतल यांना वेद रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे शीतल या खडकपाडा येथील घरात की कोन येथील घरात भाजल्या ? असा नवीन प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. सध्या खडकपाडा पोलिसांनी हे प्रकरण अधिकच्या तपासासाठी कोन पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी वर्ग केले आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *