कल्याणकरांना मिळणार १२ एकर मैदान : खासदारांनी महापौरांसह केली पाहणी
कल्याण – महानगरांमध्ये मोकळ्या जागेची वाणवा असताना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे कल्याणकरांना तब्बल १२ एकर मैदानाचा लाभ मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने मैदानासाठी आरक्षित केलेल्या या जागेच्या विकासासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही खा. डॉ. शिंदे यांनी दिलीय. या जागेपैकी अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागा तातडीने ताब्यात घेण्याचे निर्देश खासदारांनी दिले.
कल्याण पूर्वेमधील तिसगांव १०० फुटी रोड जवळील ही १२ एकर जागा महापालिकेने मैदानासाठी आरक्षित केली आहे. शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी या जागेची पाहाणी केली यावेळी त्यांच्यासोबत महापौर रमेश देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक मल्लेश शेट्टी,. नवीन गवळी, महेश गायकवाड, नगरसेविका राजवंती मढवी, शीतल मंढारी, सुशिला माळी, उर्मिला गोसावी, विमल भोईर, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, दाखिनकर आदी उपस्थित होते. सदरहू जागा संपादित करण्याची कारवाई महापालिकेने त्वरित सुरू करून जागेच्या विकासाचे कामही सुरू करावे. खासदार निधीतून काही निधी आणि महापालिकेचा निधी यांचा वापर करून विस्तीर्ण मैदान कल्याणकरांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.