कल्याणकरांच्या नशिबी वाहतूक कोंडीचे दृष्टचक्र
कल्याण (सचिन सागरे) : ऐतिहासीक शहर म्हणून कल्याणची जुनी ओळख असली तरी आता वाहतूक कोंडीचे कल्याण अशी नवीन ओळख हाऊ लागलीय. जुनं कल्याणने कधीच कात टाकली असून नवीन कल्याण नावारूपाला येत आहे. विकासाचे अनेक प्रोजेक्ट राबवले जात असले तरी सुध्दा कल्याणकरांच्या नशिबी असलेले वाहतूक केांडीचे दृष्टचक्र कायमच आहे. वाहतूक कोंडीतून कधी सुटका होईल, असा यक्षप्रश्न कल्याणकरांना सतावत आहे.
कल्याणचे हार्ट ओळखलं जाणारे शिवाजी चौक हा नेहमीच वाहतूक कोंडीच्या गराडयात सापडलेला असतो. त्यामुळे रसता ओलांडताना वृध्द महिला बालकं यांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाजी चौक ते दुर्गाडी, शिवाजी चौक ते पारनाका, शिवाजी चौक ते दुधनाका (गांधी चौकमार्गे), रामबाग, आधारवाडी, मुरबाड रोड आदी रस्त्यांनी त्याकाळी मोकळा श्वास घेतला. मोठे, मोकळे आणि सुटसुटीत रस्ते मिळाल्याचा आनंद कल्याणकरांना असला अल्पकाळच ठरलाय. गेल्या दहा वर्षात कल्याण शहराचा विस्तार अतिशय अक्राळविक्राळपणे झाला. त्यातही कल्याणातील मध्यवर्ती ठिकाणांपेक्षा वेशीबाहेरील परिसराचा पार चेहरामोहरा बदलून गेलाय. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडतानाही प्रचंड वाहतूक कोंडीतूनच मार्गक्रमण करीत प्रवाशाला बाहेर पडावे लागते. गोविंदवाडी बायपास रस्त्यामुळे मोठी वाहने ही शहराच्या अंतर्गतभागातून न जाता बाहेरून जात आहेत पण वाहनांची संख्याही तितक्या प्रमाणात वाढली आहे.रस्त्यावरील खड्डे ही समस्या कल्याण डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पुजलेली. त्यामुळेही वाहतूक कोडीत भरीस भर पडत आहे. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा नादुरूस्त आहेत. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही. कल्याणचे झपाट्याने नागरीकरण होत असताना दुसरीकडे मात्र त्याच्या नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच उपाययोजना गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधाऱ्यांकडून झाल्या नाहीत.
कुठे होतेय वाहतूक कोंडी
कल्याण रेल्वे स्थानक मार्ग, शिवाजी चौक, वल्लीपीर रोड, मुरबाड रोड, रामबाग, टिळक चौक, सहजानंद चौक, लालचौकी, खडकपाडा, आधारवाडी, बेतूरकर पाडा, दुर्गामाता चौक, कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोड, तिसगांव नाका, नेतिवली अशा सर्वच लहानमोठ्या रस्ते आणि चौकांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब होवून बसली आहे. वाहतुकीची ही कोंडी फोडता फोडता शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीही नऊ येत आहेत.
नवीन कल्याण उदयास
खडकपाडा, संभाजी नगर (गोल्डन पार्क), आधारवाडी, श्री कॉम्प्लेक्स, गांधारी आदी ठिकाणांचा कल्याणचे ‘स्टेटस सिम्बॉल’म्हणून उदयाला आलीत. कल्याण शहराच्या एकंदरीत लोकसंख्येच्या सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या या परिसरात राहत असून यावरूनच इथल्या वाढत्या पसाऱ्याचा आवाका लक्षात येईल. शहराच्या बाजारपेठा आणि रेल्वे स्थानकापासून हा परिसर लांब असल्याने गेल्या दशकामध्ये येथील वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणावर वाढली. परिवहन सेवेच्या बस, रिक्षांबरोबरच खाजगी वाहनांची संख्याही बरीच मोठी आहे. त्याशिवाय कल्याण शहरातून एक राष्ट्रीय आणि काही राज्यस्तरीय महामार्ग जात असल्याने त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडाही मोठा आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या आणि या वाहनांना अपुरे पडणारे शहरातील रस्ते हेच चित्र कल्याणात दिसू लागले आहे. कल्याणातील सर्व प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवरही वाहतूक कोंडी होवू लागली. मात्र सुरुवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे येथील वाहतूक कोंडीने आज अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.
————-