कल्याणात बुध्द मुर्तीची चोरी : रिपाइंचा आंदोलनाचा इशारा
कल्याण;-पूर्वेतील लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाजवळ असलेल्या बुध्दविहारातील पितळेची बुध्द मुर्तीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुध्दा मुर्तीच्या चोरीमुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे या चोरीचा त्वरीत छडा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिला आहे.
बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांची तीन फुट उंच आणि सुमारे २० कीलो वजनाची 40 हजार रुपये किमतीची पितळेची मुर्ती होती. शुक्रवारी सकाळी ही मुर्ती चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. तथागत भगवान गौतम बुध्द हे बौध्द बांधवांचे आदराचे आणि श्रध्देचे स्थान आहे या प्रकारामुळे बौध्द बांधवांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बुध्द मुर्ती चोरीला गेल्याचे समजताच बौध्द बांधवांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रिपाइंचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव रामा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी सहाययक पोलीस आयुक्त तसेच कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अधिका- यांशी भेट घेऊन मुर्तीच्या चोरीचा छडा त्वरीत लावण्याची मागणी केली. आठवडाभरात हा छडा न लागल्यास आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही जाधव यांनी पोलिसांना दिलाय. पोलीस अधिका-यांनीही घटनास्थळी धाव घेऊन या भागाची पाहणी केली. लवकरात लवकर चोरटयांना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.