कल्याण मधील रस्ता अपघाती मृत्यू प्रकरण…अधिकाऱ्यांना जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ,विधानसभेत करणार मागणी
अपघात झालेल्या ठिकाणची आमदार नरेंद्र पवार यांनी केली पाहणी..
कल्याण ; पश्चिमेतील शिवाजी चौकात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात शनिवारी मनीषा भोईर या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आज रविवारी दुपारी कल्याण पाश्चिम चे आमदार नरेंद्र पवार यांनी अपघात झालेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसी चे कन्सल्टंट लोकेश कानतोडे आणि महापालिका अधिकारीही उपस्थित होते. यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी रविंद्र कपोते, माजी नगरसेवक सचिन बासरेया पाहणी दरम्यान पवार यांच्या सोबत होते. यावेळी कपोते यांनी कन्सल्टंट लोकेश कानतोडे यांची कॉलर पकडून जाब विचारला. महिन्याभरात त्याच ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाल्याने आमदार पवार यांनी संताप व्यक्त केला. जून महिन्यात झालेल्या अपघातात आरोह या मुलाच्या मृत्यूनंतर पवार यांनी महापालिका आणि MSRDC अधिकाऱ्यांकडे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा त्याच ठिकाणी अपघात होऊन महिलेला जीव गमवावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार पवार यांनी या प्रकरणी महापालिकेचे शहर अभियंता आणि एमएसआरडीसी चे सबंधित अधिकारी याना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच विधानसभेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
******
अखेर कामास सुरुवात
दोन जणांचा बळी गेल्यानंतर रविवारी संध्याकाळी घाईघाईत शिवाजी चौकातील “त्या” बळी घेणाऱ्या रस्त्याची डागडुगीच्या कामास सुुरुवात केली. मात्र वेळीच कामाची डागडुज्जी केली असती तर दोन जीव वाचू शकले असते अशी संतप्त भावना कल्याणकर व्यक्त करीत आहेत.
—–