आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून भव्य आयोजन
कल्याण दि.20 ऑगस्ट : रक्षाबंधनाचा सोहळा कल्याणकरांसाठी काहीसा वेगळा ठरला. निमित्त होते ते लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिला वर्गाकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वीच महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्यातच काल असलेल्या रक्षाबंधनामुळे हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्याचे काम केले. या पार्श्वभूमीवर या महिला – भगिनींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह बहीण भावाचे नाते आणखी घट्ट करण्याच्या उद्देशाने आमदार विश्वनाथ भोईर यांनी या सामुदायिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाला लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला उपस्थित होत्या. या महिलांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना राखी बांधत लाडकी बहिणच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महीलांप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 2-3 कोटी महिलांना लाभ झाला आहे. कल्याणचाच विचार करता 1 लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या माध्यमातून प्रतिकात्मक राखी बांधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर, संजय पाटील, विद्याधर भोईर, मोहन उगले, उपशहर प्रमुख सुनिल खारूक, नितीन माने, नेत्रा उगले, कोटक भाभी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.