कल्याण स्थानकाच्या स्वच्छतेवर भर; स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या तिप्पट होणार ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विभागीय व्यवस्थापकांसह केली पाहाणी

 

कल्याण – केंद्र सरकारच्या पाहाणीत सर्वाधिक अस्वच्छ स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानक दुसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर अखेरीस रेल्वे व्यवस्थापनास जाग आली असून स्थानकाच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तिप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी स्थानकातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांच्यासह कल्याण व शहाड स्थानकांची पाहाणी केली. त्यावेळी स्वच्छतेच्या बाबतीत तातडीने पावले उचलण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली असता स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या येत्या १० दिवसांत तिप्पट करण्यात येईल, असे जैन यांनी सांगितले. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या ४८ वरून थेट १६० होणार आहे. तसेच, स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी दर १० दिवसांनी मुंबई विभागीय कार्यालयातून एक वरिष्ठ अधिकारी कल्याण स्थानकाला भेट देऊन पाहाणी करणार आहे.

खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण आणि शहाड स्थानकातील अनेक समस्या श्री. जैन यांच्यासमोर मांडल्या. कल्याण पूर्वेच्या प्रवाशांना प्रचंड मोठी तंगडतोड करत स्थानकापर्यंत यावे लागते. त्यामुळे कल्याण यार्ड रीमॉडेलिंगचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. प्रवाशांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांची, विशेषतः महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र. ७ तसेच कल्याण (पू.) स्कायवॉकवर स्वच्छतागृह बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. श्री. जैन यांनी ती तात्काळ मान्य केली. यानुसार प्लॅटफॉर्म क्र. ७ वर, तसेच स्कायवॉकच्या दोन रॅँपच्या जंक्शनपाशी किंवा सध्या काम सुरू असलेला रँप जिथे उतरतो, तिथे कायमस्वरुपी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत.

या स्कायवॉकला प्लॅटफॉर्म क्र. ७वर एस्कलेटरचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, लोकग्राम ब्रिजच्या दुरवस्थेकडेही वारंवार लक्ष वेधल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले असता येत्या तीन महिन्यांत या पुलाची दुरुस्ती करण्यात येईल, असे श्री. जैन यांनी सांगितले.

कल्याण स्थानकात विशेषतः पश्चिम दिशेला गर्दुल्ले आणि फेरिवाल्यांचा अतोनात त्रास प्रवाशांना भोगावा लागत असल्याकडेही खा. डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधले. यंत्रणांनी परस्परांकडे बोट दाखवणे योग्य नाही, प्रवाशांचा त्रास कमी झाला पाहिजे, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले. त्यावर रेल्वे, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पोलिस यांचे संयुक्त भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या पथकाकडून सातत्याने कारवाई केली जाईल आणि तिन्ही यंत्रणांच्या नियमित बैठकाही होतील, असे श्री. जैन यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

शहाड स्थानकाचीही पाहाणी खा. डॉ. शिंदे आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. येथील मुंबई दिशेकडील पादचारी पुल अतिशय अरुंद असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यावर तो पुल तोडून त्या ठिकाणी नवा रुंद पुल बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री. जैन यांनी दिली. येत्या दोन महिन्यांत या कामाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे, कसारा दिशेलाही नवा पादचारी पुल बांधण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांना दोन्ही प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर्स लावण्यात येणार आहेत. स्थानकात केवळ एकच स्वच्छतागृह असल्याबाबत खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त करून प्लॅटफॉर्म क्र. २ वरही स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली. त्यावर तातडीची बाब म्हणून तात्पुरत्या स्वरुपात पोटा केबिनचे स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश श्री. जैन यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि कायमस्वरुपी स्वच्छतागृहाचा प्रस्ताव तयार करून लगेचच मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!