कल्याण : सरकार बनल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय काम करणार यासाठी नियोजन केलं आहे. शंभर दिवसाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. देशातील तरूणाकडे नवीन कल्पना आहे. प्रत्येक गोष्ट नावीन्य आहे. यामुळे मी प्रभावित झालो आहे. तुम्ही मला नवीन कल्पना लिहून पाठवा, त्यातील निवडक कल्पनांवर आम्ही काम करू आणि विकास करू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या जाहीर सभेत दिला. यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
कल्याण भिवंडी आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी कल्याणात मोदींची जाहीरसभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला माझा नमस्कार करतो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना श्रध्दांजली अर्पण केली. मोदी म्हणाले की, भारतात आपण नवीन आत्मविश्वास बघत आहोत. आज जेवढी मेहनत करतो तेवढीच मेहनत, ४ जूननंतर पण सुरू राहणार आहे. सरकारचं ब्ल्यू प्रिंट रेडी आहे. मी काशीमध्ये होतो. त्यावेळी मी पाहिलं देशातील तरुणाकडे नवीन कल्पना आहेत. प्रत्येक गोष्ट नावीन्य आहे. यामुळे मी प्रभावित झालो आहे. तुम्ही मला नवीन कल्पना लिहून पाठवा, त्यातील निवडक कल्पनांवर आम्ही काम करू आणि विकास करू, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं आहे.
मोदी पुढे म्हणाले, तुमची स्वप्ने हा मोदींचा संकल्प आहे. माझा प्रत्येक क्षण आणि तुमच्यासाठी आणि देशासाठी असेल. आज भारत ज्या उंचीवर पोहचला आहे, तिथून पुढे देशाला कोण घेऊन जाऊ शकतो. नेहरूंच्या काळापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब..गरीब… अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून, देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादेंविरोधात नकली शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने तोंडाला कुलूप व डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका मोदींनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे जनतेच्या ह्दयातील प्रधानमंत्री आहेत, यापुढे असा प्रधानमंत्री होणार नाही. मोदीजी हे हिंदुस्थानचा अभिमान आणि गौरव आहेत. त्यांच्या चेह-यावर कधीच थकवा उदासीनता दिसत नाही. देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. देशाला महासत्ता करणार ही मोदींची गॅरंटी आहे. मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे यावेळी तिस-यांदा मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे असे शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीच्या प्रचारात उतरविले, पाकिस्तानच्या घोषणा दिल्या गेल्या. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने विकासाचा माहौल तयार झाला असल्याचे सांगून महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.
—————————-